*शिक्षकांचे फेव्हरेट विद्यार्थी*😊


*शिक्षकांचे फेव्हरेट विद्यार्थी*😊
नियमित अभ्यास करणं, कुठेही वेळ पाळणं, हाती आलेलं/घेतलेलं काम जबाबदारीने पार पाडणे, प्रामाणिक असणे, अभ्यास आणि मजा या दोन्हीचा समतोल साधणं, syllabus पेक्षा पुढे किंवा त्याहून अधिक वाचन करणं, अवांतर गोष्टी बघणं, वाचणं, मलाच खूप कळतं याहून समोर असलेल्या माणसाचाही काही अनुभव असतो यावर विश्वास ठेवणं, शिक्षकांप्रती विनम्र भाव असणं, सतत नवीन काहीतरी करून बघण्याची आस, आपलं काम जिद्दीने आणि निष्ठेने पूर्ण करणं, वेळेचं योग्य नियोजन, गरज आणि महत्त्व जाणून काम करणे
साधारण असे गुण असले की विद्यार्थी शिक्षकप्रिय असतात. शाळा कॉलेजात हे असे गुण रुजायला हवेत असा कोणाचाही अट्टहास असण्यात काय हरकत आहे!
आता असतं असं की मुलांचे 'करियर ऑप्शन्स' ठरलेले असतात किंवा त्यात त्यांनी आधीच काम करायला सुरुवात केलेली असते. आर्टस् मध्ये असं खूप होतं की मुलं नुसती पदवी असावी हाताशी म्हणून शिकतात. अधिकतर भाषा विषयांसाठी. त्यामुळे त्यांची धारणा अशी असते की कॉलेजला काय (वर उल्लेखलेले) शिस्तीचे गुण पाळायचे वगैरे वगैरे...
पण माझं निरीक्षण असं आहे की नुसत्या अभ्याससाठीचे किंवा विद्यार्थी म्हणून जोपासावेत असे हे गुण नाहीत! हे जगण्याचे पायाभूत बेसिक गुण आहेत. इथे अभ्यास, काम यांच्याजागी स्वतःची ध्येय स्वप्न घालून बघा! आयुष्यात सगळंच करताना प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, निष्ठेने काम, स्वतःला प्रगत करणं, स्वतःला ओळखणं, SWOT analysis, वक्तशीरपणा, समयसावधानता हे गुण महत्त्वपूर्ण ठरतात.
शिक्षकांना या गुणांची जोपासना करणारे विद्यार्थी आवडतात आणि ते त्यांच्यावर अधिक मेहनत घेतात.
आणि यात कुठेच टॉपर असणारे वगैरे उल्लेख नाहीय ही बाब विशेष लक्षात घेतली जावी! म्हणून तर खूपदा अभ्यासात मध्यम असलेली, वर्गात टारगटपणा करणारी, अजिबात अभ्यास न करणारी मुलंही शिक्षकांची 'फेव्हरेट' असतात नाही का!
शाळा कॉलेजात दिलेल्या अभ्यासात रस नसणं हे मला अगदीच मान्य आहे किंबहुना मी ते मान्य करवून घेतलंय. पण मग अभ्यास वगळता तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी झटताय? तुमच्या सध्या ठरवलेल्या गंतव्य स्थानी जाण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना वर सांगितलेल्या गुणांची नक्कीच गरज असणार आहे. नाहीतर या गुणांअभावी सगळीकडे अडलेली, निराशा व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभाव नाहीच!
त्यामुळे शिक्षकांना हुशार मुलं आवडतात हा गैरसमज आहे त्यांना गुणांची जोपासना करणारी मुलं आवडतात हे अधिक जास्त खरं आहे. जे गुण तुम्ही कुठेही अगदी कुठेही गेलात तरी गरजेचे आहेत!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी