सासर-माहेरच्या गोष्टी

 Shared with Public

Public
लग्न होऊन आताशे चार महिने होतील...
तरी अजून या आयुष्यात स्थिर व्हायला नेमका किती वेळ लागेल असा प्रश्न मनात नेहमीच असतो.
लग्न काही अचानक झालंय असं नाही. स्थळं बघायला सुरुवात केल्यापासूनच खरंतर मनाची हळूहळू या आयुष्यासाठीची तयारी होत असते.
पण कितीही तयारी करा..
जेव्हा नेमकं आपलं घर जे नंतर अचानक माहेर म्हणून संबोधलं जातं ते सोडून दुसऱ्या घरी, सासरी राहायला लागतो तेव्हा अगदीच कसोटीचा काळ होऊन जातो.
नेमकं कुठेच रमता येत नाही. माझं घर म्हणून घट्ट जपलेला भाव अचानक माहेर होतं.. आणि लग्न होऊन सासरचे घर आपलं करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे हक्काने हे माझं घर असं म्हणताना मन कुठेच स्थिरावलेलं नसतं.
लग्न झाल्यानंतर 10 एक दिवसांनी गुगलमॅप मध्ये होम च्या जागी लोकेशन बदलताना अचानक एक मोठा श्वास घेतला जातो.
सासर वाईट असो वा चांगलं याचा संबंध इथे नाही. सासरी राहताना काही केल्या माहेरची आठवण क्षणभर जात नाही. मृगजळा प्रमाणे माहेरची दृश्य डोळ्यासमोर उभी राहतात. त्यात आपण रमणार इतक्यात हे शक्य नाही असं आपणच आपल्याला समजावत राहतो.
एखाद्या प्रसंगाच्या संदर्भाने माहेरची एखादी आठवण स्पर्श करते आणि टचकन डोळे भरून जातात...
एरवी कशालाही धैर्याने सामोरे जाणारे आपण या आठवणींच्या खेळात फारच अशक्त होऊन जातो.
तरी फोन वर पटकन बोलता येतंच म्हणा.. मात्र मनातली घालमेल नीट कुठे स्थिरावू देत नाही हे मात्र खरं... कधी कधी ही प्रक्रिया म्हणजे अगदी एखादं झाड बहरलेलं असतं आणि पटकन त्याला दुसऱ्याच ठिकाणी लावलं जातं असं वाटत राहतं.
पण काळ हेच औषध म्हणून स्वतःला तयार करत राहायचं....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "