आत्तू -भाच्चू

 आत्तूचं लग्न आणि भाच्चूचं चिंतन -

काय रे आजकाल आत्या दिसत नाही इकडे तुझी?
हो, तिचं लग्न झालंय.
अच्छा सासरी गेलीय तर!
नाही तसं काही नाही! लग्न झालंय. लांब कुठे गेली नाहीय. तिचा मित्र आहे ना त्याच्या घरी राहायला गेलीय. तिला आवडतंय त्यांच्याकडे राहायला म्हणून तिकडे राहतेय. बाकी काही नाही. ती येणारे परत.
लग्न म्हणजे काय रे?
आपल्याला कोणी आवडलं ना की लग्न करायचं. मग आपण त्यांच्या घरी राहायला जायचं.
अथर्व मला तुझी आठवण येते रे तिकडे खूप...
अगं मग सारखी ये-जा कशाला करतेस! ये परत इकडे राहायला.
आत्या, आता तू आली आहेस ना इकडे?
हो
लगेच जाणार आहेस?
नाही, आहे मी.
आता अजिबात जाऊ नको. त्या गुरुप्रसाद मामांसोबत नाही आलीस हे खूप बरं झालं! आता त्याला आपण घरी घेऊयाच नको. मग तो तुला नेऊच शकणार नाही.
आत्या.... आता बास झालं गं.. तिकडे नको राहूस आता!
घरी कधी कोणी ओरडलं की भाच्चू लगेच सांगतो... मी आता इकडे राहणारच नाही. मी जातो आत्याकडे राहायला...
आताशा भाच्चू काळाचं विभाजन असं करतो...
आत्या तू इकडे रोज राहत होतीस ना तेव्हा
आणि तू तिकडे राहतेस तेव्हा...
भाच्चूला प्रश्न पडला...
आता आत्या आली की तिला काचेच्या ग्लासात पाणी द्यायचं का गं आजी?
आजी तूच म्हणालीस की कधी कधी येतात ते पाहुणे असतात. मग आत्या आता पाहुणी आहे का?
आत्या... तुला माहितीय तू नसतेस ना तेव्हा तुझ्या बेडवर काका झोपतो. त्याला सांग तुझं सगळं माझं आहे ना! आणि तू इथेच राहणारेस ना?
आत्तूच्या लग्नामुळे भाच्चूला बरेच प्रश्न पडतात... आठवणीने रडू येतं दोघांनाही! फक्त लहान मुलांना शब्दात मांडता येत नसतं इतकंच! त्याच्या छोट्या छोट्या कृती आणि पडणारे प्रश्न यातून ते दिसत राहतं जाणवत राहतं!
आज अथर्व खेळायला गेला आणि घरी आल्यावर मी दिसत नाही हे लक्षात येताच कापऱ्या आवाजात त्याने विचारलं...
"आजी आत्या गेली का गं..."
आणि अचानक माझ्या मनात सगळं ढवळून आलं! वरचे सगळे प्रसंग आठवले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी