Atleast Inform
छोट्या छोट्या गोष्टी...
कॉर्पोरेट क्षेत्रात आल्यापासून नवनवीन सवयी नेटाने लावून घेण्याचा प्रयत्न केला. कॉर्पोरेट असलं तरी माझं क्षेत्र तसं creative असल्याने फार जाचक वगैरे नाहीच. मात्र यातले काही नियम माझे मलाच फार आवडू लागलेत. सुरुवातीला मला प्रत्येक मेलला रिप्लाय करायची अजिबात सवय नव्हती. मी वाचलंय. त्यावर काम करते आहे... पण याची कोणाला तरी खबर हवीच की....हा एकच प्रसंग आहे पण दिवसभरात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यात एक फार साधीशी गोष्ट अपेक्षित असते. ती म्हणजे 'You should inform', 'कळवायचं तरी'! एकत्र काम करत असताना बऱ्याचदा आपण मनाशी काही ठरवतो आणि काम करायला घेतो. पण आपण एकटे नाही ही जाणीव ठेवून प्रत्येक पायरी टीम सोबत शेअर करणं ही जबाबदारी असते आपली.
हे वरवर कामासाठीचं वाटत असलं तरी नाती सांभाळतानाही आपण ही जबाबदारी सांभाळायला हवी हे निरीक्षण करता करता माझं मलाच जाणवू लागलं.
एकदा मी एका मोठ्या नामांकित गृहस्थांच्या घरी गेलेले. त्यांनी मला माझ्या प्रत्येक प्रश्नावर योग्य मार्गदर्शन केलं. विषय अभ्यासाशी निगडित असल्याने बरीच चर्चा झाली. निघताना मी त्यांना म्हटलं, की मी जे काही ठरवेन ते उद्या येऊन कळवते. त्यांना माझं फार कौतुक आहे. लाडकी वगैरे तसंच काही. मी ठरवलं. मनोमन योग्य ते निवडता आलं, विचार प्रक्रिया सोप्पी झाली म्हणून त्यांचे आभारही मानले. मात्र जाऊन त्यांना सांगितलंच नाही! काही दिवसांनी मला त्यांचाच फोन आला की अगं तू कळवलं नाहीस, तुला हे सोप्पं गेलंय की अजूनही द्वंद्व आहे! कुठल्या विचारात अडकलीस का?? असं बरंच काही आम्हाला वाटून चिंतीत झालो अगं. ते काळजीने म्हणत होते आणि इकडे मला मेल्याहून मेल्यासारखं झालं, की यांच्या हृदयाचे किती ठोके आपण आपल्या बेजबाबदार वागण्याने वाया घालवले असतील. मी त्यांना फक्त हो ठरवलं. हा हा विषय घेतलाय. जमलं मला. सोप्प वाटलं असं म्हणून फोन ठेवला. त्यांच्या बद्दल मनात नितांत आदर असल्याने आपण चुकलो या भावनेने नंतर घळाघळा अश्रू वाहू लागले.
कित्येकवेळा कोणासोबत बोलता बोलता आपल्याला दुसरं काही काम आलं की आपण सहज सांगतो Ae मी तुझ्याशी थोड्या वेळाने बोलते, सकाळी बोलते, रात्री फोन करते, आता एक फोन येतोय परत करते 2 मिनिटांत फोन... किंवा कोणाकडे गेलो आणि घाईत असताना.. आता घाईत आहे पण मी उद्या येते, मी थोड्या वेळात परत येते... आणि इतकं सगळं बोलून आपण विसरून जातो!
दुसरं म्हणजे आपण कोणालातरी वेळ देतो..कशाहीसाठी. काम क्षुल्लक आहे, मोठं आहे हे महत्त्वाचं नाही... पण जमणार नसेल किंवा जे काही असेल ते you should at least inform.
आपण आपलं बोलणं हे 'बोलायची पद्धत असते' असं म्हणत generalize करतो किंवा आपण आपल्याही नकळत समोरच्याला फारच गृहीत धरतो. पण जेव्हा आपली वाटणारी माणसं अशी वागतात तेव्हा आपल्याला हे गृहीत धरणं जाणवतं.
Just imagine समोरचा माणूस काही महत्त्वाचं बोलत असेल किंवा बोलणार असेल आणि आपण मधेच ही वर दिलेली कारण सांगितली. आणि ती व्यक्ती वाट बघतेय आपली!... आणि आपल्याला याची यत्किंचितही जाणीव नसणं ही आपल्यातली शुष्क झालेली संवेदनशीलता आहे असं मला वाटतं.
एकतर म्हटलेय तसं करायचं किंवा सरळ जमत नाही वाटलं तर मला हे जमणार नाहीय. जमेल तेव्हा करेन. असं स्पष्ट सांगावं.
हो नाही मध्ये उत्तर असलं तर 'प्रयत्न करेन' असं म्हणणं सोयीचं आहे. पण जेव्हा आपण ठाम असतो, नसेल जमणार तेव्हा स्पष्ट नाही म्हणणं आपली जबाबदारी आहे. आपण 'कदाचित' येऊ, कॉलबॅक करू या विचाराने डोळे लावून बसलेले लोक तुम्ही कधी पाहिलेत का? किंवा मग कधी तुम्ही कधी हे केलं असेल तर यातली आर्तता कळेल.
तेव्हा कसंही, काहीही असेल तिकडे स्पष्ट बोलणं, आठवणीने रिप्लाय देणं जमायला हवंय.
अनेक गुंतागुंत झालेले धागे मनावर अप्रत्यक्षपणे ताण आणत असतात. आपल्याला ते सर्व माहीत असण्याची सुतराम शक्यता नसते. त्यामुळे या अगदी सहज आणि क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमध्ये ठाम आणि जबाबदारीने वागत त्यात सरलता आणली की नकळत एक धूसरसा गुंता सोडवला जातो. हे जाणवेल! फील होतं हे! आणि हळूहळू आपल्या शब्दांविषयी लोकही ठाम होतात तो त्यांच्या डोळ्यात आपल्याविषयी वाटणारा विश्वासही आनंद देतो.
हे कधी जमेल का १०० टक्के माहीत नाही पण प्रयत्न करायला अजिबात हरकत नाहीय.
***जमेल तेच बोला आणि बोलाल ते जमवा... नाहीतर 'Atleast Inform'! 😁🤘
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा