जातीभेदासोबत आलेला प्रमाण-बोली भेद
सुजय डहाके प्रकरणावरून खूप पोस्टी वाचल्या... त्याच्या बाजूने, त्याला विरोध करणाऱ्या...
सर्व प्रकरणांचा विचार केला असता मला इथे जात, भाषा यावरून कोण श्रेष्ठ, कसा अन्याय याविषयी चर्चा वाचली. खरंतर **जात, धर्म, पंथ, संप्रदाय, आर्थिक स्तर, लिंग, रंग आणि भाषा या किंवा कोणत्याच मुद्द्यावरून आपण माणसांमध्ये भेद करू नयेत हा मुद्दा अधिक ठळकपणे मांडला जाणं आणि ठसवणं ही गरज आहे असं वाटतं.** पण अन्यायाचे, त्रासाचे किस्से सांगताना समानतेपेक्षा विषमतेचे कारणच अधिक भाव खाऊन जाते हे दुर्दैव आहे.
प्रत्येक व्यक्तीमध्ये सर्व गुणवत्ता असते फक्त त्याचे प्रमाण कमीअधिक असते (जे अधिक असते ते उठून दिसतं)... जसं वर्गातला हुशार मुलगा हा अभ्यासात हुशार म्हणून जितका श्रेष्ठ तितकाच पाठी बसणारा मुलगा खेळात हुशार म्हणूनही श्रेष्ठ! मात्र यावरून कोणी एकमेकांना आपण उच्च समजून सुनावत राहणं गैरच! गुणवत्तेची कदर आणि गुणांची समानता लक्षात घेणे महत्वाचं! मग शाळा, कॉलेजात खेळाडूंना, extra-curricular activities करणाऱ्यांनाअधिकचे 10 गुण का असतात हे लक्षात येईल.. मग आपोआपच गरिबी, भाषा, जात आरक्षण यावरून दोष देण्यापेक्षा त्यामागची कारणमीमांसा जाणून घेत समानतेचा विचार मनात डोकावतोच.
आता मुद्दा भाषेचा...
आता पोस्ट जातीवरून भाषेवर गेल्या... आपापले मांडलेले अनुभव आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचताना जाणवलं की...
भाषा हवी तशी, वाटते तशी बोलावी...कारण
व्याकरण अंधश्रद्धा आहे...
'ण' इतकं निरुपयोगी अक्षर भाषेत नाहीय...
प्रमाणबोली बोलणं किंवा कोणाला प्रमाण उच्चार सांगणं यांना भाषेतला अट्रोसिटी गुन्हा म्हणावं असं आहे...
प्रमाणबोली यायला हवी हा आग्रह तुम्हाला चुकीचा वाटतो. का तर आम्ही जे कधी बोललो नाही ते आम्ही मूठभर लोकांनी केलेल्या प्रतिष्ठेपायी का बोलावं..... वगैरे वगैरे अनेक मुद्दे.
माझ्यामते प्रमाणभाषेचा द्वेष करण्यापेक्षा भाषेत उच्च-नीच मानून इतरांना हीन लेखणाऱ्यांच्या वृत्तीचा द्वेष करायला हवा! आणि याविषयी व्यक्त होताना स्पष्टपणे वृत्तीला दोष द्यावा.
मी स्वतः प्रमाण मराठीच बोलते. जन्मापासून मुंबईत राहिल्याने हे असं. पण तरी माझं एक मत सुरुवातीपासून कायम आहे...'जर प्रमाण भाषा श्रेष्ठ मानून तुम्ही बोली बोलणाऱ्या व्यक्तीला हीन मानत असाल तर तुम्ही स्वतःला भाषाप्रेमी किंवा भाषेचे अभ्यासक म्हणून घेण्यास पात्र नाही.'
प्रमाणभाषेने सार्वत्रिक होण्यास मदत होते. सर्व बोली सर्वांना ज्ञात नसतात. (पश्चिम महाराष्ट्रातील माणसासमोर अहिराणी, कोकणी बोली बोलून बघा). आपल्या प्रत्येकाला आपापल्या बोलींचा अभिमान असायला हवा आणि आपण त्यांचे जतन करायलाच हवे. मात्र आपण मोठ्या जनसमुदायापुढे काही मांडत असतो तेव्हा ती मर्यादित प्रदेशाच्या बोलीतून मांडणे कसे शक्य आहे? माध्यमात काम करणारे, पत्रकार, शिक्षक आदी व्यक्तींनी प्रमाण भाषेचं ज्ञान असू द्यावं. कामाच्या ठिकाणी त्याचा वापर करावा इतर ठिकाणी सर्रास स्वतःच्या बोलींचा वापर करायचा.
एखादं वृत्तपत्र महाराष्ट्रभर जात असेल तर त्यांनी मूळ पाने प्रमाण व त्या त्या प्रदेशाच्या पुरवणीत त्या त्या बोली वापरणे हे योग्य.
3 4 % लोकांची भाषा आम्ही का बोलू असं म्हणून मतं मांडणारी, भांडणारी माणसं स्वतःचे लेख, पुस्तकं यात मात्र प्रमाण बरोबर लिहितात. तिथे ते अजिबात न चा ण करत नाहीत! मात्र प्रमाण भाषेचा मुद्दा काढला की बुद्धिभेद करत बोली जपा प्रमाण हटवा हे धोरण मांडतात!
आणि भाषेचे कुठलेच नियम मान्य नाहीत! व्याकरण नको... न ण नको, ऱ्हस्व-दीर्घ नको, थोड्या दिवसांनी उकार-वेलांटीही नको. नुसतीA B C सारखी अक्षरे, तीही हळूहळू खूप वाटतील... याने काय साध्य होणार आहे?
निदान तुम्ही जेव्हा संपूर्ण एका भाषिक समाजापुढे एखाद्या माध्यमातून (वर्तमानपत्र, बातम्या, महाविद्यालय, विद्यापीठ) काही मांडता तेव्हा तुम्हाला प्रमाण भाषा अवगत असणं अपेक्षित आहे. तिथे जाऊन अशी अपेक्षा का करता म्हणून बंड करण्यात काय हशील? भाषा संवाद माध्यम असले तरी तिला लिखित स्वरूपही आहे आणि तिची इतर कार्येही आहेत. हा मुद्दा 'सोप्प आयुष्य' (खरंतर आळस, निरुत्साह) या मुद्द्यावर दुर्लक्षित केला जातो.
व्याकरण नियम किंवा काहीही जोवर येत नाहीत तोवर नकोसे वाटतात. एकदा का ते जमू लागले की बोली व प्रमाण दोघांविषयी प्रेम वाटते आणि आपोआप ते जपलंही जातं.
आपली बोली जपण्याचा प्रयत्न आपण वैयक्तिकपणे जिथे व्यक्त होतो त्या प्रत्येक ठिकाणी आवर्जून करावा.
तेव्हा प्रमाण आणि बोली असा उच्च नीच भेद करण्यापेक्षा जागा, प्रदेश, समोरची व्यक्ती, तुमचे पद याचे भान ठेवत त्याचा विचारपूर्वक वापर होणे महत्त्वाचे आहे आणि इतके भान प्रत्येक भाषाप्रेमी हमखास बाळगू शकतोच! उगाच विघातक पद्धतीने बदल करण्यापेक्षा कधीतरी विधायक प्रयत्न करावेत आपण!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा