'इंजिनियर्स डे'च्या निमित्ताने






'इंजिनियर्स डे'च्या निमित्ताने
असं नाहीय की मी कधीच इंजिनियर्सवर केलेल्या जोक वर हसले नाहीय. मित्रांच्या घरी चाललेली बडबड आणि kt म्हणजे इंजिनियर्सच्या जीवनाचा अविभाज्य भाग समजणाऱ्या लोकांना पाहून अर्थातच हसू येतं. "आजकाल इंजिनियर्स कचऱ्यासारखे पडलेत. त्यांना कोणी भाव देत नाही. इंजिनियरिंग करतात, एवढा पैसा खर्च करतात आणि शिपायांच्या पगाराएवढी नोकरी करतात.
इंजिनियरिंगमुळे भारतात बेरोजगारी वाढते." वगैरे वगैरे अनेक गोष्टी तुम्हीही ऐकल्या असतीलच...
आणि या सगळ्यापुढे एक निष्कर्ष असा की भारतात शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळत नाहीत. उपयोजित शिक्षण नाहीच. या गोष्टीत मी पूर्णतः सहमत नाही.
हे जे वर वाचलंय ते सगळंच्या सगळं लोक कुठल्या विषयाला म्हणत नाहीत! हा प्रश्न मला पडतो. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या लोकांना तो विषय शिकून नोकरी नाही म्हणून सरसकट मत बनवू नयेच ना!
मी तर एक असा विषय शिकले ज्या विषयाशी नोकरी या शब्दाचा संबंध आहे असं लोकांना स्वप्नात सुद्धा वाटत नाही.
मला तर अजूनही आठवतं अर्थशास्त्र सोडून मी जेव्हा 'मराठी वाङ्मय' हा विषय निवडला तेव्हा माझ्यावर प्रेम करणारी बरीच शिक्षक मंडळीसुद्धा फार रुसली होती. अनेकांना असंही वाटलं की मी माझं करियर बरबाद वगैरे करून घेतलं!"इतकी हुशारी वाया घालवतेस लक्षात ठेव. कादंबऱ्या तू इतर विषय शिकूनही वाचू शकतेस" टाइप कमेंट्स. खरंतर मी असं बरंच काही शाळेत असल्यापासून केलंय जे लोकांना नाराज करतं. जसं की, "सगळं उत्तम असताना तुला का आर्टस् ला का जायचंय??" बरं ते असो
आता मूळ मुद्दा असा की, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घ्या तुम्ही त्यातून तुमचा रोजगार मिळवू शकता हा माझा ठाम विश्वास आहे. यासाठी तुम्ही खूप नंबरात येणारेच असावेत असंही नाहीय (हे सांगण्याचं कारण म्हणजे आता असंही मी ऐकून घेते की तू हुशार आहेस गं, म्हणून तुला जमलं!). फक्त तुम्ही जे शिकलयात त्यावर तुमचं प्रेम हवं, अभ्यास करण्याची चिकाटी हवी आणि सर्वात आधी हा विषय शिकून मी काहीतरी मिळवलंय हा विश्वास वाटायला हवा.('स्वयंअध्ययन' वगैरे करावं की फॉलो किती ते शिक्षक वाईट शिकवतात वर टाकायचं सगळं!) (अपुनच भगवान है टाइप्स)
सतत शिक्षणपद्धतीला दोष देत, हे हे शिकून नोकरी न मिळाल्याने चहा विकतो, रस्त्यावर गाडी टाकतो, वडापाव विकतो आणि खूप कमावतो वगैरे उगाच बोलायला ऐकायला कोणाला बरं वाटत असलं तरी मला ती माणसं भयंकर निराशा असणारी वाटतात. त्यापेक्षा एखादी पदवी घेऊन मला यात आता आवड नाही किंवा मी यात काही करू शकेन असं मला वाटत नाही, पण मला अमुक तमुक मध्ये आवड आहे आणि मी हे करेन, असा व्यवसाय करेन हे मला पटतं! Atleast या लोकांना माहीत असतं की त्यांना काय जमतंय आणि काय नाही. पदवी, शिक्षण, सरकार, बेरोजगारी या विषयांवर चर्चा करून, त्याला दोष देऊन, वेळ वाया घालवून समाजात नकारात्मक विचार पसरवण्यापेक्षा स्वतःला समजून योग्य क्षेत्र निवडणं असं सकारात्मक व्हावं असं मला वाटतं.
तुम्ही तुमचा तुमचा विषय अधिक आत्मीयतेने शिकणं, त्यात विविध कौशल्य आत्मसात करणं आणि सतत स्वतःला जगभराशी नाही पण निदान शिकतो त्या विषयासोबत अद्ययावत ठेवणं ही काळाची गरज आहे. इतकं केलं नाही कीच मग असे शब्द येतात की नोकऱ्या नाहीयेत, शिकून उपाशी मरायची वेळ आहे वगैरे वगैरे वगैरे...
तुम्ही नाही करू शकलात हे मान्य करा आणि करू शकलात हेही मान्य करा. दोन्हीमुळे बळच मिळतं!
जाता जाता जे लोक माझ्यावर नाराज होते ते आता माझी नोकरी असो किंवा इतर अनेक गोष्टी करताना आनंदी असलेली मी पाहून समाधानी आहेत.
Just trust whatever you do! कोणाच्या प्रभावाखाली एखादा निर्णय घेण्यापेक्षा स्वतःला ओळखून इतरांची मतं मार्गदर्शन म्हणून घेत निर्णय घेतलेला कधीही योग्यच असतो. And do believe that you can create what you want!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी