वेगवान जग...

मुंबई कधी थांबत नाही! काल बॉम्बहल्ला, गोळीबार काहीही झालं असेल आज ती पुन्हा नव्या जोमाने दिवसाची सुरुवात करते. मुंबईकर कधी थांबत नाही! खरंतर मुंबईच्या रिमोट मध्ये स्टॉप बटण नाहीय!
काय आहे ना सुरुवातीची वाक्य आधी काही वर्षापूर्वी वाचली की जरा अभिमान वगैरे वाटायचा! नंतर जरा जरा कळू लागलं तर जाणवलं की मुंबई का थांबत नाही... मग यामागची आर्थिक,सामाजिक सर्वच कारणं कळू लागली.
इथे माणसांमधलं Survival Instinct भरभरून वाढतच चाललंय! आता हल्ली याची चिंताच वाटते...
बेस्ट बसच्या संपाला आता सात दिवस वगैरे होतायत. एव्हाना माणसांना बसची उणीव जरी जाणवत असली तरी तिला आलेल्या पर्यायी व्यवस्थेवर कधीही माणसं स्थिरावली जातील याचा मला विश्वास वाटतो. पर्यायी व्यवस्थांमध्ये बसल्यावर,रिकामटेकड्या वेळेत, बस पेक्षा जास्त पैसे द्यावे लागले की ऐकू येतात त्या संपावर ताशेरे ओढणाऱ्या चर्चा!पण फक्त तेव्हाच!
इथे बातम्यांमध्ये 'अजूनही संप चालूच' असं वाचताना/ ऐकताना हे रोजचं दृश्य बघून न पाहिलेल्या पण अभ्यासात असलेल्या मिल संपाच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. अर्थात असं अजिबात होऊ नये. वेळीच संपाबद्दल योग्य निर्णय व्हावा असं वाटत राहतं...
पण या निमित्ताने रोज survival instinct चा विचार मनात घोळत राहतो.. हे survival मानसिक, शारीरिक कसंही.
कालपर्यंत ज्याच्याशिवाय पानही हलत नव्हतं अशा गोष्टी, माणसं आज सोडून किंवा त्यांना पाठी ठेवून अगदी सहज 'Move On' केलेल्या माणसांच्या वागण्याला नक्की काय म्हणावं?!
कुठेही मध्ये गाठ का पडलीय याचा विचार होण्याऐवजी सरळ धागा कापून टाकणे किंवा मग दुसरा घेणे हे सोयीस्कर वाटून अवलंबणे हल्ली जास्त दिसतं!हे असं स्वतःच्या वागण्यातही मला जाणवतं कधी कधी!
कोनामध्ये गुंतून थांबण्यापेक्षा पुढे जावं..'जीवनात ज्या गोष्टी येतात त्यात सेटल व्हायला शिकायचं' हा विचार इतका व्यापक वाटतो की सेटल होण्यात काय काय मारलं जातंय, सुटतंय,दूर जातंय किंवा दुसऱ्याचं काय याचा विचार करण्याची क्षमता कमी होतेय का हा विचार अंतर्मुख करत जातो. जगण्याचा आणि त्यातल्या आव्हानांचा  वेग इतका प्रचंड वाढतोय की काही राहिलंय का, कोणी मिस झालंय का किंवा आपण कोणाला miss करतोय का याचाही विचार मागे पडतोय...

'कोणावाचून कोणाचं काही अडत नाही' हे वाक्य माहीत असावं त्याची जाणीव असावी पण जगण्याचा पाया हे वाक्य होऊ नये असंच वाटतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रेन,प्रवास आणि मी

" मानवी समाज आणि अंधश्रद्धा "

सासर-माहेरच्या गोष्टी