अंबरनाथ शिव मंदिर अभ्यास सहल.
तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल..
*अंबरनाथ येथील पुरातन शिव मंदिर*
सोबत पुरातत्व अभ्यासक @sneha Nagarkar
*अंबरनाथ येथील पुरातन शिव मंदिर*
सोबत पुरातत्व अभ्यासक @sneha Nagarkar
पावसाशी सततचा लपंडाव चालू असल्याने सगळं लिहून घेता नाही आलं पण जितकं लक्षात राहिलंय आणि जे काही थोडं लिहिलेलं ते असं...
आपल्याकडे सर्वप्रथम कौटिल्य,पातंजली यांच्या लिखाणात भारतातील मंदिरांचा उल्लेख आढळतो. भारताचा समृद्ध इतिहास पाहता कालावधी आणि बदलत्या संस्कृती नुसार मंदिरांचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळतात. भोज राजाच्या 'समरांगण सूत्रधार' या ग्रंथात आपल्याला मंदिरांचे विविध उल्लेख वाचायला मिळतात. जसे की गोल मंदिर, भूमीज मंदिर,उत्तर भारतात अधिक दिसणारी नागर मंदिरे , कर्नाटकात दिसणारी द्रविड मंदिरं त्याचबरोबर नागर आणि द्रविड मंदिरांचे मिश्रण असलेली वेसर मंदिरे. आणि यानंतर मंदिरं कशी बांधली गेली,कोणाकडून बांधली गेली,मूर्ती पूजेला कशी सुरुवात झाली हे ऐकत ऐकत आम्ही पोहोचलो अंबरनाथ येथील पुरातन शिवमंदिरात.
विद्याधर जीमूतवाहनचे वंशज असं म्हटले जाणारे मूळचे उस्मानाबाद मधील तागर जिल्ह्याचे राजे शिलाहार. त्यांच्या अधिपत्याखाली उत्तर,दक्षिण कोंकण आणि कोल्हापूर चे राज्य होते. श्रीस्थानक म्हणजेच आजचे ठाणे त्यांची राजधानी होती. यांनी शालिवाहन शके १९८२ मध्ये अंबरनाथ येथील या शिव मंदिराचे बांधकाम केले. राजा चित्तरंज याच्या कारकिर्दीत बांधकाम सुरु झाले आणि त्यांच्या जागी आलेल्या राजा नागार्जुन मग त्याचा वारस राजा मुम्मुनी याच्या काळात मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिराची बांधणी करताना राजा हा यजमान होता तर आचार्य हे स्थापत्य सांभाळणारे.
या मंदिराच्या स्थापत्याची विविध विशेष समजून घेतानाच इतिहासातील त्याचा संबंधही आम्ही ऐकत होतो. मंदिराच्या बाह्य बांधणीत काही उभे आयताकार असलेले नक्षीकाम केलेले भाग दिसतात. यांना लाट म्हणतात. मंदिराच्या बांधणीकडे बघताना खालच्या थराकडे गज म्हणजेच हत्ती दिसतात. याला गजथर म्हणतात.हा थर म्हणजेच वेदीबंध अधिष्ठान ज्याला पाया असंही म्हटलं जाऊ शकतं . यामागे असा अर्थ आहे की मंदिराचा भार हा या हत्तींनी घेतलेला आहे .यानंतर येतो तो नर थर. यात नरसिंहाचे शिल्प दिसते. मंदिर जरी शंकराचे असले तरी इथे बाह्य नक्षीकामात विष्णूच्या मूर्ती दिसतात. शैव आणि वैष्णव संप्रदायामध्ये वैष्णव फार कट्टर दिसतात त्यामानाने शैव संप्रदायात विष्णूचा उल्लेख किंवा मूर्ती आपल्याला दिसतात.या मंदिराच्या शिल्पांमध्ये विष्णूचे तीन अवतार दिसतात ते म्हणजे नरसिंह, वराह आणि एक विष्णुरूप. या मंदिराचे बांधकाम हे मध्यप्रदेश येथील उदयपूर मधील उदयेश्वरच्या मंदिरासारखे आहे. तिथल्याच अमरनाद यावरून अंबरनाथ हा शब्द आला असावा. तसेच कळसाजवळ दिसणारे स्तंभ हेही याच्या बांधणीचे वैशिष्ट्य आहे. कळसाचे वैशिष्ट्य असेही की त्याजवळच्या नक्षीकामात अनेक छोटी छोटी मंदिरे दिसतात.यानंतर देवी देवता आणि साधू यांच्या मूर्ती दिसतात. यातल्या देवी म्हणजे नवदुर्गा असाव्यात असे पुरातत्व अभ्यासक कुमूद कानेटकर यांनी मत मांडले. मधल्या भागात नग्न स्त्रियांच्या मूर्ती दिसतात.यांना खरतर सुरसुंदरी म्हटलं जातं. याना सर्जनाची देवता असेही म्हटले जाते. मंदिराचे सौंदर्य वाढण्यासाठी म्हणून यांचेही शिल्प आपल्याला दिसते. सहसा आपल्याला कुठे ब्रह्माचे मंदिर दिसत नाही पण शिलाहारांच्या काळाचे वैशिट्य आहे की त्यांच्या काळात ब्रह्माला फार महत्व होते म्हणूनच याही मंदिरात आपल्याला बाह्यभागात ब्रह्माचे मंदिर दिसते. बाह्यभागात काही रिकामी देवघरांसारखी जागा दिसते याला भद्र म्हणतात जिथे देवांसाठी जागा तयार केलेली असते. मंदिर प्रदक्षिणा करताना या भद्रच्या वर दिसते ती हरिहरपितामहसूर्य मूर्ती. ही देवतांचे मिश्रण असलेली मूर्ती दिसते.याची माहिती आपल्याला शैव सिद्धांत मांडलेल्या आगम ग्रंथात सापडते.
त्यानंतर दिसते ती सूर्याची मूर्ती. हिला ओळखायचे कसे तर सूर्य हा एकाच देव असा आहे ज्याच्या पायात बूट्स दिसतात. हे बूट्स म्हणजे गमबूट्स सारखे असतात आणि त्याचे कपडे हे पर्शियन माणसांसारखे असतात. याला इराण मधून आलेल्या शाकद्वीपांचा संबंध आहे. आणि त्याच्या थोड्या खालच्या थरात दिसते ती एका अरब स्त्रीची मूर्ती. त्यांच्या दैनंदिन जीवनाचं वर्णन करणारे हे शिल्प. खरंतर शिलाहारांचा व्यापारानिमित्ताने अरबांशी संबंध आला. त्यामुळे अरब संस्कृती दर्शनही येथे दिसते. अरबांचा भारताशी आलेला संबंध याचे आणखी एक उदाहरण म्हणजे सुरज दलाल यांनी गुजरातमधील संजान गावी केलेल्या उत्खननातही अरब वस्तीचे पुरावे सापडले होते. पुढल्या भागात दिसते ती अग्नी देवतेची मूर्ती. अग्नीची मूर्ती म्हणजे थोडा ढेरपोट्या आणि दाढी असलेला देव.
खरंतर ही वैशिष्ट्य माहित असली म्हणजे आपल्याला चटकन दिशाही कळू शकेल. कारण प्रत्येक दिशेच्या दैवतानुसार त्या त्या ठिकाणी त्या देवतेची मूर्ती स्थापिली आहे.
त्यानुसार पुढे दिसते ती वरुणाची मूर्ती.या सर्व देवी देवता सोबत दिसते ती मार्कण्डेय ऋषींची मूर्ती. मार्कंडेयांची गोष्ट तर आपल्याला माहीतच आहे.
या मंदिराच्या स्थापत्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे या विविध मूर्तींसोबतच यजमान म्हणजेच राजा,स्थापत्य बघणारे आचार्य यांच्याही मूर्ती दिसतात.
हे भूमीज मंदिर म्हणजे भूमीतून जन्मलेले. याचे गर्भगृह हे मंडपापासून १०-१२ पावले खाली आहे. गर्भगृहात दिसते ते शिवलिंग जे भूमिज.
या मंदिराबाबत असाही म्हटलं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे त्याचप्रमाणे मंदिराखालून काही किलोमीटरचा मार्गही होता जो आता नाही असं म्हटलं जातं.
अशी सर्व माहिती आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन एकत्र भोजनाचा आनंद घेतल्यावर सगळ्यांनी आपापल्या घराची वाट धरली. तोपर्यंत पावसानेही थोडी विश्रांती घेतलीच होती.
येथील फोटो पुढील लिंक वर पाहू शकाल.
https://www.facebook.com/ashwinimane420/posts/1711055378943431?__tn__=K-R
खूप छान माहिती ..
उत्तर द्याहटवा