ये जो गुड गर्ल या बॅड गर्ल ये जो इमेज बनाया हुआ है ना ये सब एकदम बकवास है!!
ये जो गुड गर्ल या बॅड गर्ल ये जो इमेज बनाया हुआ है ना ये सब एकदम बकवास है!!
बात सिर्फ इतनीसी हैं की आप अपनी जिंदगी को किस तरिके से जिना चाहते हैं....
वेळ असला की शॉर्ट फिल्म्स आणि वेब सिरीज बघणं हा माझा नवा छंद आहे. अर्थात यामागे माझा स्वभाव आणि फायदाही तितकाच आहे कारण सलग ३ तास देण्यापेक्षा दिवसाआड २० -२५ मिनिटे देण मला परवडतं.
कारण एखादा चित्रपट कधी कधी ३ तासात जे नीट सांगू शकत नाही ते खूपदा एखादी शॉर्ट फिल्म किंवा ४-५ भागांची वेब सिरीज फार खोलात शिरून मांडते असं मला जाणवतंय..
हा तर हे सगळं यासाठी की आजच एक वेब सिरीज पाहून संपली.. फक्त ५ भागांची ही मालिका दि गुड गर्ल शो! पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या चार मुलींची गोष्ट आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगांना प्रत्येकीने आपापल्या विचारसरणीने केलेला प्रतिकार..
सुरुवातीला आधी कधीतरी मी याचा मधलाच भाग पाहिलेला मला बरा वाटलेला नंतर बघेन म्हटलं पण नंतर नावाचं विसरले.. आज थोड आठवतंय त्यावरून शोध सुरु केला आणि सापडली ..
सुरुवातीच्या भागात अगदी नेहमीसारखी त्याच रूममेट्स, पेइंग गेस्ट , दिल्ली गर्ल्स ,अशांवर असावी किंवा एक बिहार मधून आलेली साधी मुलगी आणि तिचा प्रवास (गर्ल इन दि सिटी सारखं) असा काहीसा विषय असेल असा अंदाज मी मांडला पण यात असं काहीच नाहीय :P
शेवटच्या दोन भागात मात्र मला ही मालिका जास्त आवडली आणि विषयही. अर्थात विषय आपल्या रोजच्या चर्चेतला आहे. पण मांडणी मला आवडली ...
स्त्री सक्षमीकरण हा विषय आपण सगळेच बोलतो यावर कितीतरी उहापोह आपण केलेले आहेत.. सगळ्या बाजूनी विचार मांडून ऐकून झालेले आहेत. तेच यातही मांडलेले आहेत पण ते कसे मांडलेत आणि त्यांचा विचार ते आपल्या विचारात भरविण्यास किंवा आपल्याला अजून विचार करायला कसं भाग पडतात हे फार आकर्षक आहे. साध्या शब्दाच्या,संवादाच्या माध्यमातून एक सामान्य कथा घेऊन स्त्री सक्षमीकरणासोबतच स्त्रीवाद, स्त्रीवादी विचारसरणी असणारे लोक आणि त्यांच्या वागण्यातला विरोधाभास,ढोंगीपणा (हा विषय मला जास्त महत्वाचा वाटला ) बदलते स्त्रीजीवन , हॉस्टेल मधे किंवा पेइंग गेस्ट राहणाऱ्या मुलींबद्दल असणारे पूर्वग्रह, कशा वागल्या म्हणजे मुली वाईट किंवा कशा वागल्या म्हणजे मुली चांगल्या हे आपले आपणच ठरवलेले प्रमाण... आपण प्रत्येकच जण हे ठरवत असतो पण आपापल्या व्याप्तीनुसार (यात मीही आहेच). पत्रकार,वकील,समाजसेवक,कार्यकर्ते अशा कितीतरी पदांवर आपण काम करतो पण समाजाच्या अनिष्ट मानसिकतेच्या आपण पुढे गेलोय का? की असे विषय हाताळताना आपण पुरोगामी पद्धतीने विचार तर करतो पण समाजासमोर तेच मांडताना मात्र तेच प्रश्न विचारतो जे त्या अनिष्ट मानसिकतेला पडतात !! यातही एक विरोधाभासच आहे ! असे सगळे विषय त्यांनी या पाच भागात मांडलेत जे नक्कीच एका विचारी मनाला हात घालतात. शेवटच्या भागात एका वाहिनीवर या चार मुलींची घेतली जाणारी मुलाखत समाजमानसिकतेवर योग्य बोट ठेवते.
भेट गुंडाळलेला कागद कसा आहे यावरून भेट कशी असेल हे ठरवणे म्हणजे मूर्खपणा आहे पण पूर्वग्रहानीशी जगताना आपण हाच मूर्खपणा नेहमी करतो हे मात्र खरंच आहे ! आपण आपल्या पद्धतीने जीवन जगताना दुसऱ्यांच्या जगण्याची पद्धत कशी स्वीकारतो हेही तितकंच महत्वाचं आहे..(उदा.हल्ली स्पृहा जोशींच्या बोल्ड फोटोवर आलेल्या प्रतिक्रिया) किंबहुना त्यातूनच आपले विचार आणि आपली संस्कृती व्यक्त होत असते.
बाकी मलाही जे कॉलेजच्या दिवसात पटलेलं ते नव्याने पटलं..
ये जो गुड गर्ल या बॅड गर्ल ये जो इमेज बनाया हुआ है ना ये सब एकदम बकवास है!!
बात सिर्फ इतनीसी हैं की आप अपनी जिंदगी को किस तरिके से जिना चाहते हैं....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा